मुंबई : दि.०४ : महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात देखील आपण अनेकदा असे राजकीय नेते पाहिले आहेत आणि ऐकले आहेत जे राजकारणापलीकडे जाऊन मैत्री, नातेसंबंध व वैयक्तिक संबंध जपत असतात. राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो तर दोन विविध पक्षीय नेत्यांमध्ये असतात ते वैचारिक मतभेद, हे सर्वांनाच ज्ञात आहे. ह्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा नुकताच पहावयास मिळाला. राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे गेली १० वर्षे सक्षमपणे नेतृत्व करणारे शिवसेनेचे आमदार राजन साळवी हे त्यांच्या दिलदार, खिलाडूवृत्ती सारख्या अनेक स्वभावांमुळे अखंड महाराष्ट्राला सुपरिचित असलेले व्यक्तिमत्व ! मैत्रीचे संबंध कसे ठेवायचे आणि राजकारणापुरत राजकारण कसं करायचं ह्यामध्ये निष्णात असलेल्या आमदार राजन साळवी ह्यांनी राजकारणापलीकडे जाऊन अनेकांशी मैत्रीचे संबंध देखील ठेवले आहेत व राजकारणात प्रखर वैचारिक विरोध करावयास देखील आमदार राजन साळवी कधी कमी पडले नाहीत. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राहिलेले व येणाऱ्या सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील ह्याच मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले आमदार राजन साळवी ह्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी अजित यशवंतराव हे सध्या हृदयविकाराने आजारी असून त्यांच्या ४ रक्तवाहिन्यांमध्ये “ब्लॉकेज” असल्याने मुंबईतील प्रसिद्ध हिंदुजा रुग्णालयामध्ये त्यांचेवर दि. २९ ऑगस्ट रोजी बायपास ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ही बातमी समजताच आमदार राजन साळवी ह्यांनी तात्काळ शुक्रवार दि. ३० ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये दाखल होऊन खिलाडूवृत्ती दाखवत आपले राजकारणातील प्रतिस्पर्धी अजित यशवंतराव ह्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस करण्यासाठी हिंदुजा रुग्णालय गाठले. परंतु “बायपास” ही अवघड शस्त्रक्रिया झाल्यामुळे अजित यशवंतराव हे अतिदक्षता विभागामध्ये असल्याने आमदार राजन साळवी व त्यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. आमदार राजन साळवी ह्यांनी रुग्णालयामध्ये उपस्थित असलेल्या अजितजींच्या बंधूंची भेट घेतली व अजितजींच्या तब्येतीविषयी आस्थेने चौकशी केली आणि अजितराव ह्या संकटातून लवकरात लवकर सुखरूप बाहेर पडावेत आणि राजकीय मैदानावर पुन्हा उतरावेत, अश्या भावना आमदार राजन साळवी ह्यांनी अजितजींच्या बंधूंकडे व्यक्त केल्या. आमदार राजन साळवी ह्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याविषयी दाखवलेली तत्परता व आस्थेने केलेली चौकशी हे त्यांच्यातील दिलदारपणा व खिलाडूवृत्ती दाखवून गेले. माझ्यावर देखील अश्या प्रकारचे संकट येऊन गेले आहे. त्यामुळे अश्या प्रसंगात राजकीय गणिते बाजूला ठेऊन अजितजींना व त्यांच्या कुटुंबियांना धीर देणे हे माझे कर्तव्य असून अजित यशवंतराव आणि मी एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलो आणि आमचे वैचारिक राजकीय मतभेद असले तरीही त्यांच्यावर आजाराच्या माध्यमातून आलेल्या संकटातून ते लवकरात लवकर बाहेर पडावेत, अशीच माझी विघ्नहर्त्याचरणी प्रार्थना असल्याचे आमदार राजन साळवी ह्यांनी सांगितले.