मुंबई, दि. ०७ : काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या खासदार निधीतून मुंबईतील सेंट जॉर्ज शासकीय रूग्णालयाला १ कोटी रूपये देण्यात आले आहेत. मुंबई शहरचे जिल्हाधिकारी तसेच राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या संचालकांना पत्र पाठवून त्यांनी ही माहिती दिली आहे. कोरोनावर उपचार करण्यासाठी विशेष रूग्णालय म्हणून जाहीर झालेल्या सेंट जॉर्ज या मुंबईतील ३०० खाटांच्या शासकीय रूग्णालयाला वैद्यकीय उपकरणांसाठी तातडीने १ कोटी रूपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे पत्र वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांनी खासदार पी. चिदंबरम यांना पाठवले होते. परिस्थितीचे गांभीर्य व या उपकरणांची आवश्यकता लक्षात घेता त्यांनी तातडीने दखल घेऊन हा निधी मंजूर केला आहे. पी. चिदंबरम यांनी दिलेल्या १ कोटी रूपयांच्या खासदार निधीतून २ डिजिटल पोर्टेबल एक्सरे मशिन, १० पॅरा – मॉनिटर, ४ डिफिब्रिलेटर, ४ सक्शन मशिन, ६ स्प्लिट एसी आणि २ हजार पीपीई किट खरेदी केल्या जाणार आहेत.