वडोदरा, दि. २० : लॉकडाऊनमुळे गेले दिड महिने वडोदरा येथे अडकलेल्या तरुणांना राज्यात स्वगृही आणण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने मदतीचा हातभार लावला आहे. लॉकडाऊन मुळे गुजरात येथील बडोद्यामध्ये मूळची महाराष्ट्रातली मुले अडकली आहेत. शिक्षण घेत असतांनाच कॉल सेंटर आणि मॉल्समध्ये काम करणारे हे तरुण-तरुणी गेल्या २ महिन्यांपासून तिथेच अडकले असून त्यांचा पगार थांबला असून या सर्वांनी पायी यायचा मार्ग पत्करला होता. नंदुरबार येथे नर्मदा बचाओ आंदोलनच्या सामाजिक कार्यकर्त्या लतिका राजपूत आणि ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानच्या जिल्हा कार्यकारी अधिकारी योगिनी खानोलकर या  परराज्यात अडकलेल्या तरुण विद्यार्थी आणि मजुरांना स्वगृही आणण्यासाठी काम करतात. या दोघी वडोदरा येथे अडकलेल्या या तरुण-तरुणींना आणण्यासाठी कार्यरत होत्या. परंतु आर्थिक मदत हव्या तितक्या प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने महाराष्ट्र टाईम्सच्या पत्रकार अनुजा चवाथे यांनी सोशल मीडियावर आवाहन करत क्राऊड फ़ंडिंगचे आवाहन केले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव मानस पगार यांच्या निदर्शनास हे प्रकरण आल्यावर त्यांनी पुढाकार घेत अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्यासमोर ही अडचण मांडली. त्यातून महाराष्ट्र युवक काँग्रेसतर्फे २५ हजार रूपयांची मदत उपलब्ध झाली असून, २१ तरुणी आणि ११ तरुण खासगी बसद्वारे राज्यात पोहोचत आहेत. यापुर्वीही  लॉकडाऊनच्या काळात मेस आणि खानावळी बंद असताना मानस पगार यांनी पुढाकार घेत पुण्यातल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी युवक काँग्रेसतर्फे निशुल्क टिफिनची घरपोच सुविधा उपलब्ध केली होती.