रत्नागिरी : दि. ०३ : रत्नागिरी जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्थेच्या सर्व सभासदांना प्रतिवर्षी गणपतीपूर्वी लाभांश वितरीत केला जातो. परंतू कोव्हीड-१९ महामारीमुळे शासनाच्या निर्देशांप्रमाणे पतसंस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी माहे मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ दिलेली असल्याने व जिल्हयात कलम १४४ नुसार मनाई आदेश लागू असल्याने पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा गणपतीपूर्वी आयोजित करता आलेली नाही. जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यास परवानगी मिळणेबाबत अथवा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कार्योत्तर मान्यतेला अधिन राहून सभासदांना लाभांश मंजूर करण्याचे अधिकार संचालक मंडळाला देण्याबाबत पतसंस्थेने ना. उदय सामंत, मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा यांचेमार्फt सहकार मंत्री, सहकार राज्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांजकडे तसेच सहकार आयुक्त व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांजकडे सातत्याने पाठपुरावा केलेला होता. तसेच याबाबत महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मार्फतही शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केलेला होता. पतसंस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांना मुदतवाढ दिलेली असल्याने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कार्योत्तर मान्यतेला अधिन राहून सभासदांना लाभांश मंजूर करण्याचे अधिकार संचालक मंडळाला देण्याबाबत पतसंस्थेने व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले. दि. १४ ऑक्टोबर २०२० रोजी झालेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये पतसंस्थेमधील शिल्लक रकमेच्या विनियोगाचे अधिकार, पुढील वर्षाच्या आर्थिक पत्रकांना मंजूरी देणे व लेखापरीक्षकांची नेमणूक करणे असे महत्वाचे विषय वार्षिक सर्वसाधारण सभेने मंजूर करण्याऐवजी सदर मंजूरीचे अधिकार संचालक मंडळाला देण्याचा तसेच सदर बाबीला लगतच्या होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मंजूरी घेणे आवश्यक असल्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. दरम्यान रविवार, दि. ०१/११/२०२० रोजी जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये दि. १४/१०/२०२० रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार व त्याबाबत महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल महोदय यांचे स्वाक्षरीची अधिसूचना, महाराष्ट्र शासन सहकार विभागामार्फत निर्गमित करण्यात येणाऱ्या शासन निर्णय/परीपत्रकाला अधिन राहून पतसंस्थेच्या सर्व सभासदांना १०% दराने लाभांश वाटप करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच सदर विषयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल महोदय यांचे स्वाक्षरीची अधिसूचना दि. ०२/११/२०२० रोजी प्रसिध्द झालेली आहे. त्यामुळे पतसंस्थेच्या सभासदांना दिवाळीपूर्वी लाभांश वाटप करण्यामध्ये कोणतीही अडचण नाही. पतसंस्थेच्या सभासदांना लाभांश वाटप करण्याबाबत कागदोपत्री आवश्यक असणारी सर्व कार्यवाही पूर्ण करून घेवून सर्व सभासदांना दिवाळीपूर्वी लाभांश वाटप करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. लाभांशाची रक्कम गतवर्षीप्रमाणेच सर्व सभासदांचे बँक खात्यात जमा करण्यात येईल, याची सर्व सभासद बंधू-भगिनी यांनी नोंद घ्यावी व संचालक मंडळाला सहकार्य करावे असे आवाहन रत्नागिरी जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.