रत्नागिरी : दि. १२ : यावर्षीच्या दिपावलीच्या सणात हिंदू बांधवांप्रमाणेच मुस्लिम बांधवांनी देखील कंदिल किंवा दिवा लावून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देऊयात असे आवाहन कॉंग्रेस नेते व माजी राज्यसभा खासदार हुसैन दलवाई यांनी केले आहे. १४ नोव्हेंबर पासून संपूर्ण भारतात दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे. हिंदू बांधवांचा हा एकमेव सण आहे जो एकाच वेळी संपूर्ण भारतात साजरा केला जातो. या सांस्कृतिक व राष्ट्रीय सणाच्या दिवशी हिंदू बांधवच नाही, तर देशातील इतर धर्मिय सुध्दा आपल्या व्यापारातील चोपड्या बदलतात व मोठ्या संख्येने आणि मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.

दिवाळीचा सण हा रोषणाईचा सण म्हणून ओळखला जातो. रोषणाई करून सर्वत्र प्रकाश पसरविण्याचे काम केले जाते. किंबहुना सर्व भारत वासियांच्या जीवनात रोषणाई येवो अशा प्रकारची अपेक्षा केली जाते. मागील 7-8 वर्षांपासून या देशामध्ये सत्तांतराच्या नंतर कोरोना, बेरोजगारी, आरोग्य व महागाई मुळे सर्वच क्षेत्रामध्ये जातीय वाद व द्वेष पसरलेला आहे. अशा परिस्थितीत आपण सर्वांनी हा अंधार दूर व्हावा, अशी अपेक्षा करूया. या सणात हिंदू बांधवांबरोबर आपण सर्व इतर धर्मियांनी विशेषतः मुस्लिम बांधवांनी कंदील किंवा दिवा लावून आम्ही सुध्दा झालेला अंधार दूर करण्याकरिता आपल्या सर्वांच्या सोबत आहोत, असा एकतेचा संदेश दिला पाहिजे. यासाठी आपणास आवाहन करतो की, दिवाळीच्या दिवशी कंदिल किंवा दिवा लावून आजच्या परिस्थतीत देशाला आवश्यक असलेल्या एकतेचा संदेश द्यावा असे आवाहन कॉंग्रेस नेते व माजी राज्यसभा खासदार हुसैन दलवाई यांनी केले आहे.