रत्नागिरी, दि. ०४ :  कुवारबाव येथील मानेज इंटरनॅशनल स्कूल या सी.बी.एस.ई बोर्डाच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे पुनरागमनप्रदीर्घ कालावधीनंतर झाले.१ डिसेंबर २०२० पासून शासनाच्या परिपत्रकानुसार इ.१० वी व नव्याने सुरु झालेल्या ११ वी विज्ञान आणि वाणिज्य या शाखेचे नियमित वर्ग (ऑफलाईन) चालू झाले आहेत.

शाळा सुरु होण्यापूर्वीच शाळेतील सर्व शिक्षक आणि इतर कर्मचारी वर्गाची ॲऩ्टीजेन चाचणी झाली आहे. त्याचप्रमाणे दररोज शाळेतील शिक्षक, कर्मचारी आणि सर्व विद्यार्थ्यांचे तापमान व रक्तातील ऑक्सिजन पातळी तपासले जाते. याचबरोबर शाळेमध्ये सुरक्षित अंतर मास्क, सॅनिटायझर (SMS) या कोरोना प्रतिबंधात्मक उपायांचे सर्वांकडून काटेकोरपणे पालन केले जाते. खबरदारी म्हणून शाळेतील वर्गाचे व विद्यार्थ्यांसाठी असणा-या बसेसचे दररोज निर्जंतुकीकरण केले जाते. या ऑफलाइन शाळेला इ.१०वी तील विद्यार्थ्यांनी चांगली उपस्थिती दर्शवली आहे. नव्याने सुरु झालेल्या ११वी वाणिज्य व विज्ञान शाखेतील ७०%हून अधिक विद्यार्थ्यांनी हजेरी लावून या ऑफलाइन शिक्षणालाच पसंती दर्शवली आहे.

सद्य परिस्थितीमध्ये ऑनलाइन शिक्षण हा एक पर्याय असला तरीसुद्धा ऑफलाइन शिक्षण हेच महत्त्वाचे आहे. हे विद्यार्थ्यांच्या लक्षणीय उपस्थितीवरून दिसून येते.

संस्थेच्या कार्याध्यक्षा नेहाजी माने यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन हे ऑफलाइन वर्ग सुरु करण्यात आले आहेत, अशी ग्वाही शाळेचे मुख्याध्यापक श्री. उल्हास सप्रे यांनी दिली आहे.
अनेक महिन्यांनी शाळा सुरू झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना दहावीचा विद्यार्थी ओबेद दवे म्हणाला की अत्याधुनिक सुविधा असल्या तरी पारंपारिक पद्धतीनेच छान शिकता येते. तर अकरावीची विद्यार्थीनी आर्या कुलकर्णी म्हणाली की प्रत्यक्ष वर्गात शिकणे हेच प्रभावी माध्यम आहे.