रत्नागिरी, दि. १७ : आमच्या सोबत आलात तर ठीक नाहितर तुमच्याशिवाय. पण राजापूरात कॉंग्रेस ग्रामपंचायत निवडणुका लढणारच असा सज्जड ईशारा रत्नागिरी जिल्हा कॉंग्रेस कमिटीने दिला आहे. कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अॅड.विजय भोसले, माजी विधान परिषद आमदार सौ.हुस्नबानू खलिफे व नवी मुंबई महानगर पालिकेचे नगरसेवक अविनाश लाड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कॉंग्रेस पक्षाच्या वतीने निवडणुकांसाठी तयारी केली जाणार आहे. गुरुवारी राजापूर तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने जवाहर चौक पिक अप शेड येथील सभागृहात जिल्हाध्यक्ष अॅड.विजय भोसले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अॅड.विजय भोसले, माजी विधान परिषद आमदार सौ.हुस्नबानू खलिफे, तालुकाध्यक्ष व नगरसेवक सुभाष बाकाळकर, दिपक राऊत, प्रदेश सोशल मिडिया सेलचे विनय खामकर आदी उपस्थीत होते.

यावेळी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मनोहर सप्रे, महंमदअली वाघू, जितेंद्र खामकर, मंदार सप्रे, आदींनी या निवडणुकींच्या अनुषंगाने आपली मते व्यक्त केली. यावेळी पंचायत समिती गटनिहाय प्रमुख पदाधिका-यांच्या समित्या तयार करुन स्थानिक पातळीवर निवडणुका कशा लढायच्या आहेत याबाबत चर्चा करण्यात आली. ज्या ठिकाणी महाविकास आघाडी स्थापन करायची असेल त्या त्या ठिकाणी शिवसेनेसोबत साधक बाधक चर्चा करण्यात येईल. भाजपसोबत आघाडी करण्याचा अद्याप निर्णय नाही. मात्र शिवसेनेला ज्या ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडिची आवध्यकता भासत असेल त्या ठिकाणी शिवसेनेनेच कॉंग्रेसला निमंत्रित करावे लागेल. कॉंग्रेस स्वतःहून महाविकास आघाडीसाठी पुढे सरसावणार नाही. असे मत काही कॉंग्रेस नेत्यांनी व्यक्त केले.