रत्नागिरी  | प्रतिनिधी | दि. १५ : राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या वाढत आहे.  दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आता रत्नागिरी  जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. काल जिल्हाधिकारी कार्यालयात 38 जण कोरोना बाधित सापडल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

कोरोनाचा  शिरकाव सरकारी कार्यालयात झाल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली आहे.  रत्नागिरीत  कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड मोठ्या प्रमाणावर पसरत आहेत.  त्यामुळे सगळ्यांनीच काळजी घेणे आवश्यक आहे. विनाकारण तुम्ही प्रवास करु नका, असे आवाहन जिल्हाधिकारी मिश्रा यांनी केले आहे. काल जिल्हाधिकारी कार्यालयातील तब्बल 38 जण कोरोना बाधित सापडले आहेत.

यात जिल्हाधिकारी कार्यालयातील 36 जण, तहसीलदार कार्यालयातील 2 जण असे मिळून जवळजवळ 38 जण आज एकट्या जिल्हाधिकारी कार्यालयात पॉझिटिव्ह निघालेले आहेत. संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज ठप्प झाले असून जिल्हाधिकार्यालय यातील महत्त्वाचे विभागाचे प्रमुख असलेले अधिकारी, कर्मचारीही बाधित झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, बाधित लोकांना काहीच लक्षणे नव्हती .तसेच त्यांनी कोरोना लस घेतल्यामुळे त्यांना कोरोनाचा जास्त त्रास होत नसल्याचे सांगण्यात येत आहे.