रत्नागिरी | दि. 12

रत्नागिरीत पावसाचा जोर वाढत आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहराला पाण्याचा धोका देखील वाढत आहे. सध्या या ठिकाणीहून व्यापाऱ्यांनी आपला माल सुरक्षित स्थळी हलवला असून नागरिकांना देखील इशारा देण्यात आला आहे. रविवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसानं जिल्ह्यात जोरदार बॅटिंग सुरू केल्यानं राजापूर शहरा जवळून वाहणाऱ्या अर्जुना आणि कोदवली या नद्यांना पूर आला आहे. पावसाच्या वाढत्या जोरासोबतच या नद्यांच्या पाणी पातळीत देखील वाढ होत आहे. दरम्यान, या नद्यांना आलेल्या पुराचा आणि पाण्याचा अंदाज घेत ब्रिटीशकालीन पुलावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे मुंबई – गोवा हायवेवरील वाहतुकीवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

दक्षिण कोकणात पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला असून सद्यस्थितीत तरी पावसाचा जोर वाढत असल्याचं चित्र आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये पावसाचा जोर चांगलाच असल्याचं चित्र सध्या आहे. वातावरण आणि हवामान विभागाचा अंदाज पाहता हा जोर वाढण्याची देखील शक्यता आहे.