रत्नागिरी : राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजन साळवी यांना पुन्हा एकदा 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी द्यावी की देऊ नये याबाबत उलटसुलट चर्चा होती मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या चर्चेला पूर्णविराम दिल्याचे समजते आहे. 2019 च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राजापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार राजन साळवी हेच शिवसेना पक्षाचे उमेदवार असतील याची निश्चिती झालेली आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये अपेक्षेप्रमाणे कोकणात शिवसेनेला भरघोस यश मिळाले. रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या तीनही आमदारांनी आपल्या मतदारसंघामध्ये मागील निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्य देत शिवसेनेचे सचिव आणि खासदार विनायक राऊत ह्यांना निवडून आणण्याची जबाबदारी अतिशय व्यवस्थितपणे पार पाडली आहे. लोकसभेच्या निकालानंतर आता विधानसभेचे वारे वाहू लागल्याचे सर्वत्र दिसत आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी सतत चर्चेत राहणारा मतदारसंघ म्हणजे लांजा-राजापूर हा विधानसभा मतदारसंघ. अतिशय ग्रामीण आणि दुर्गम असलेला हा मतदारसंघ पूर्वी अनेक वर्षे काँग्रेसच्या ताब्यात होता. तो काँग्रेसकडून शिवसेनेच्या ताब्यात आणून आता शिवसेनेचा बालेकिल्ला करण्याची किमया केली ती विद्यमान आमदार राजन साळवी ह्यांनी ! आज हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हे नाकारून चालणार नाही आणि लोकसभेच्या निकालावरून हे सिद्ध देखील झाले आहे. मागील निवडणुकीत खासदार विनायक राऊत ह्यांना राजापूर विधानसभा मतदारसंघातून सुमारे २२००० चं मताधिक्य होतं, तो आकडा ह्या निवडणुकीत ३३,००० पार करून गेला आहे. ह्यामध्ये मतदारांसोबत सर्वसामान्य शिवसैनिकांची व महायुती च्या कार्यकर्त्यांची मेहनत आणि आमदार राजन साळवी ह्यांचा प्रचंड जनसंपर्क ह्याचा महत्वाचा वाटा आहे, हे देखील जाणून घेतले पाहिजे. आज ह्या मतदारसंघाचा बारकाईने अभ्यास केल्यास आमदार राजन साळवी हे नेते असून कार्यकर्त्यासारखे वागत असल्याने येथील शिवसेना एकसंध बांधून ठेवण्यात ते यशस्वी झाले आहेत. आमदार राजन साळवींच्या गैरहजेरीत येथील पदाधिकारी फार मोठी उंची गाठताना कधीच दिसत नाहीत. ह्याचाच अर्थ असा की आमदार राजन साळवी हे येथील शिवसेनेचा एक मजबूत पाया आहेत. असे असून देखील येथील शिवसेना मजबूत असल्याने काही इच्छुकांची नावे विधानसभा निवडणुकीसाठी सतत पुढे येत असताना दिसत असतात. कोणी इतर पक्षातून येऊन उमेदवारी घेण्यासाठी इच्छुक तर काही स्वपक्षीय विशेषतः स्वपक्षीय मुंबईकर ह्यांची नावे ह्यामध्ये घेतली जातात. काही नेते मुंबई येथे जास्त काळ असल्याने त्यांना आता आमदारकीची स्वप्ने पडणे काही गैर नाही, परंतु त्यांचा ह्या मतदारसंघाबद्दलचा अभ्यास किती आहे हा देखील अभ्यास करण्यासारखाच विषय आहे. परंतु तरी देखील राजापूर विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीतच एवढे मताधिक्य देऊन देखील अशी नावे येत असल्याने ह्या संदर्भात सखोल चौकशी करत काही अंतर्गत सूत्रांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केल्यास असे समजते की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची जोखीम न पत्करण्याच्या दृष्टीने खासदार व शिवसेना सचिव विनायक राऊत ह्यांनी विधानसभेचे उमेदवार म्हणून आमदार राजन साळवी ह्यांच्या नावाची घोषणा ह्यापूर्वीच ओणी येथील जाहीर सभेमध्ये करून इच्छुकांची हवाच काढून टाकली आहे. काही स्वपक्षीय इच्छुक खासदारांना मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेले असता तेथे देखील खासदारांनी त्यांना स्पष्ट शब्दात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार आमदार राजन साळवीच राहणार असून तसा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांचा आदेश असल्याचे सांगून त्यांना परतावून लावल्याचे दबक्या आवाजात ऐकावयास मिळते. तसेच काही खास सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या भरघोस यशाबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांचे अभिनंदन करावयास गेलेल्या आमदार राजन साळवी ह्यांना उद्धव ठाकरे ह्यांनी, विधानसभेला तू ह्यापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आला पाहिजेस मग मी तुझं अभिनंदन करणार असल्याचे सांगितल्याचे कळते. त्याचप्रमाणे मी माझ्या जुन्या शिवसैनिकांना कधी विसरेन अशी कल्पना देखील कोणी करू नये, तू निर्धास्त जा आणि विधानसभा निवडणुकीची जोरात तयारी कर, मी तुझ्या सोबत असल्याचे देखील उद्धव ठाकरे ह्यांनी आमदार राजन साळवीना सांगत त्यांच्या विधानसभा उमेदवारीला एकप्रकारे “क्लीन चिट” दिल्याचे समजते. त्यामुळेच बहुदा अनेक वेळा राजापूर विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये विविध वृत्त येत असून देखील कोणतीही प्रतिक्रिया न देता आमदार राजन साळवी मात्र शांतपणे मतदारसंघामध्ये आपले काम करताना दिसतात. एकूणच उद्धव ठाकरे ह्यांनी दिलेल्या निर्णयामुळे आमदार राजन साळवी ह्यांचे एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून “मातोश्री” वरील वजन तर दिसून येतेच शिवाय राजापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराबाबत होणाऱ्या विविध चर्चांना उद्धव ठाकरेंच्या निर्णयामुळे आता पूर्णविराम मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.